लॉकडाऊनचे उल्लंघन करत नमाज पठनासाठी जमलेल्यांना पोलिसांनी दाखवला इंगा


मुर्शिदाबाद – कोरोना विषाणूचा धोका कमी करण्यासाठी 25 मार्चपासून देशात लॉकडाउन लागू आहे. परंतु या काळात लॉकडाऊन उल्लंघनाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. शुक्रवारी कुलूप तोडून आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करत अनेक लोक पश्चिम बंगालमधील एका मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले होते. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या मशिदीत पोहोचलेल्या बर्‍याच लोकांनी मास्कसुद्धा घातला नव्हता. यासंदर्भातील वृत्त आजतकने दिले आहे.

मशिदीत नमाजसाठी जमलेले लोक एकमेकांपासून विशिष्ट अंतर राखत नव्हते. मात्र, पोलिसांनी त्यांना बाहेर पडण्यास सांगितले तेव्हा लोकांनी मशिद खाली केली. मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक बहुल जिल्हा आहे. येथील गोपीपूर मशिदीत नमाज अदा करण्यासाठी शुक्रवारी लोक जमले होते.

मशिदीत लोकांना जमल्याची माहिती एका अधिकाऱ्याला समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचत मशिदीचे इमाम तस्लीम राजा यांना लॉकडाऊनचे पालन करण्याची सूचना केली. त्याचबरोबर भविष्यात पुन्हा लॉकडाऊन उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा स्थानिक अधिकाऱ्याने इमाम तस्लिम राजा यांना दिला.

मुर्शिदाबादची मशिदी रिकामी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. वेळेवर कारवाई केल्याबद्दल बरेच लोक पोलिसांचे कौतुक करत आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमधील 116 हून अधिक लोकांमध्ये कोरोना संक्रमणाची पुष्टी झाली आहे.

तसेच दिल्लीच्या निजामुद्दीन तबलिगी जमातच्या मरकज येथे धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी लोकांच्या जमावामुळे भारतातील बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक परदेशी नागरिकांनीही तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमात भाग घेतला. केंद्र सरकारने मरकजच्या कार्यक्रमाला देशातील कोरोना संसर्ग वाढण्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले होते.

देशातील बर्‍याच राज्यांत तबलिगी जमातशी संबंधित काही लोकांचा शोध अजूनही घेण्यात येत आहे. त्याच वेळी जुन्या दिल्लीतील चांदनी महाल भागातील 13 मशिदींमधून 102 जमाती काढण्यात आल्या. त्यापैकी 52 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. बर्‍याच राज्यांत कोरोना विषाणूचे हॉट स्पॉट सील करण्याचे कामही सुरू झाले आहे. लोकांना सील केलेल्या परिसरातून बाहेर येण्यास मनाई आहे. कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात मास्क घालणेही अनिवार्य केले आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7400 पार झाला आहे. कोरोनामुळे 239 लोकांनी प्राण गमावले आहेत. भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे दररोज वाढत आहेत. मृतांची संख्याही वेगाने वाढू लागली आहे. गेल्या 24 तासांत 40 लोकांनी प्राण गमावले. त्याच वेळी, जगभरात कोरोना-संक्रमित लोकांची संख्या 16,98,400 झाली आहे. आतापर्यंत जगात 1,02,700 पेक्षा जास्त लोकांनी आपले जीव गमावले आहेत.

Leave a Comment