100 दिवसात जगभरातील 1 लाखांपेक्षा लोकांनी गमावला आपला जीव


मुंबई : कोरोनामुळे 100 दिवसात जगभरातील 1 लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे. सद्यस्थितीत जगभरात जवळपास 17 लाख कोरोनाग्रस्त असून 1 लाख 2 हजारांवर बळींची संख्या आहे. यापैकी तीन लाख 76 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजून जवळपास 12 लाख 19 हजार लोक कोरोनाग्रस्त आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 850 कोरोनाग्रस्त गंभीर आहेत.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस यांनी लॉकडाऊन हटवले तर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणणे कठीण जाईल, असा धोक्याचा इशारा दिला आहे. लॉकडाऊन हटवण्यात घाई केली तर बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

गेल्या 24 तासात अमेरिकेत 2 हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. अमेरिकेत आता एकूण बळींचा आकडा 18 हजार 726 वर तर रुग्णांची संख्या पाच लाखांवर पोहोचली आहे. काल न्यूयॉर्कमध्ये 777 बळी गेले आहेत. तिथे रुग्णांची संख्या 1 लाख 72 हजारांवर आहे तर एकूण मृतांचा आकडा 7844 एवढा आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 1932, मिशिगनमध्ये 1281, लुझियाना 755, इलिनॉईस 596, कॅलिफोर्निया 584 आणि वॉशिंग्टनमध्ये 483 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे. अमेरिकेत गेल्या 10 दिवसात तब्बल 14 हजार 662 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

तर गेल्या चोवीस तासात स्पेनमधील 634लोकांचा बळी गेला आहे. एकूण मृतांचा आकडा 16 हजार 81 वर पोहोचला आहे. गेल्या दहा दिवसात स्पेनने 7 हजार 617 लोकांनी आपला प्राण गमावला आहे. काल इटलीत कोरोनाने तुलनेने कमी म्हणजे 570 माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 18 हजार 849 एवढी झाली आहे. काल रुग्णांची संख्या 4 हजारने वाढली, इटलीत आता जवळपास 1 लाख 48 हजार रुग्ण आहेत. इटलीत 9 मार्चला सुरु झालेला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे.

कालचा दिवस इंग्लंडसाठी आणखीनच चिंतेचा होता, तिथे एका दिवसात सर्वाधिक 980 लोकांचा जीव गेला, तेथील बळीचा आकडा पोहोचला 8958 वर पोहोचला आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाग्रस्त पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले आहे.

काल दिवसभरात फ्रान्सने 987 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 13 हजार 197 बळी गेले आहेत. एकूण रुग्ण सव्वा लाखाच्या घरात आहेत. जर्मनीत काल 160 बळी गेले, एकूण बळींची संख्या 2767 एवढी आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 122 ची भर पडली. एकूण 4232 मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत. तर रुग्णांची संख्या 68200 इतकी झाली आहे. कोरोनाने बेल्जियममध्ये काल 496 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 3019 एवढी झाली आहे.

हॉलंडमध्ये काल 115 बळी घेतले तिथे एकूण 2511 लोक दगावले आहेत, टर्की, ब्राझील, स्वित्झर्लंडने 1 हजार बळींचा टप्पा ओलांडला आहे. स्वीडनमध्ये 870 , पोर्तुगाल 435, कॅनडात 569, इंडोनेशिया 306, तर इस्रायलमध्ये 95 बळी कोरोनोमुळे गेले आहेत. दक्षिण कोरियात काल 4 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 208 वर पोहोचला आहे. आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या 4695 वर पोहोचली आहे, तिथे 66 लोकांचा बळी घेतला आहे.

Leave a Comment