लॉकडाऊनदरम्यान आमदार अनिल भोसलेंच्या भावाचा मुंबई-पुणे प्रवास


पुणे : राज्यात लॉकडाऊन असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांनी मुंबई-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी स्वत:च्या सहीचे पत्र कुटुंबियांना मुंबईहून आणण्यासाठी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या पत्रावर आक्षेप घेतला आहे. पण ज्यांच्या सही शिक्यानिशी हे पत्र देण्यात आले आहे, त्या प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी त्यांच्या कार्यालयातील कुणीतरी आधीच सही करुन ठेवलेल्या पत्राचा गैरवापर केल्याचा दावा केला आहे.

राज्यात सध्या येस बँक घोटाळ्यातील वाधवान बंधूंसह त्यांच्या कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्याची विशेष परवानगी देण्याचे प्रकरण गाजत असतानाच आता तशाच प्रकारचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आमदार अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांच्यासह चार जणांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. मुंबईतील वांद्रे येथील नातेवाईकांना आणण्यासाठी नितीन भोसले यांनी 8 एप्रिलला पुणे-मुंबई असा प्रवास केला. मावळचे प्रांत संदेश शिर्के यांनी त्यासाठी परवानगीचे पत्र दिल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. पण आपण पत्रच दिले नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सहकारी बँकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिल भोसले हे जेलमध्ये आहेत. 71 कोटी 78 लाख रुपयांचा घोटाळा शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत झाल्याचा आरोप आहे. नियमबाह्य पद्धतीने शिवाजीराव सहकारी बँकेने कर्जांचे वाटप केल्याचा आणि संचालकांच्या नातेवाईकांनाच कर्ज दिल्याचे उघड झाल्यावर, रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक केली होती. अनिल भोसले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानपरिदषदेचे आमदार बनले होते. पण तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत घरोबा केला होता. अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले या भाजपच्या नगरसेविका आहेत. या घोटाळ्या प्रकरणी ज्या 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये रेश्मा भोसले यांचाही समावेश आहे.

Leave a Comment