या आर्थिक वर्षात केवळ एक रुपया पगार घेणार कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ!


मुंबई : कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीमुळे यंदा ते वेतन म्हणून फक्त एक रुपया घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर पीएम केअर्स फंडामध्ये 25 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होणारे नुकसान पाहता उदय कोटक यांनी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केवळ एक रुपयाच वेतन घेणार असल्याचे सांगितले.

उदय कोटक यांची बेसिक सॅलरी 2019 या आर्थिक वर्षात 27 लाख रुपये होती. कोटक यांच्या या घोषणेनंतर याच ग्रुपच्या टॉप लीडरशिप टीमनेही वेतनामध्ये 15 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकेने गुरुवार (9 एप्रिल) रोजी पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली. कोटक महिंद्रा बँक घोषणा करत आहे की, समुहाच्या टॉप लीडरशिप टीमने एकजूट होऊन आपल्या वेतनात 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात आर्थिक वर्ष 2021 साठी असेल, असे या पत्रकात म्हटले आहे.

वैयक्तिकरित्या आपले वेतन म्हणून केवळ एक रुपयाच घेण्याचा निर्णय उदय कोटक यांनी घेतला आहे. सोबतच पीएम केअर्स फंडात 25 कोटी रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती कोटक महिंद्रा बँकेच्या पत्रकात देण्यात आली. याआधी कोटक महिंद्रा ग्रुपने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर स्वत: उदय कोटकही वैयक्तिकरित्या या फंडमध्ये 25 कोटी रुपयांची मदत केली आहे.

कोटक महिंद्रा बँक आणि उदय कोटक यांनी एकत्रिकत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सहाय्यता निधीमध्ये 60 कोटी रुपये जमा केले आहेत. पीएम केअर्स फंडमध्ये उदय कोटक यांनी वैयक्तिकरित्या 25 कोटी रुपये, तर कोटक महिंद्रा बँकेने 25 कोटी रुपयांची मदत केली आहे. उदय कोटक यांनी महाराष्ट्र सहाय्यता निधीत 10 कोटी रुपयांची मदत केली आहे.

Leave a Comment