लॉकडाऊन : बाहेर फिरताना आढळल्यास पोलीस देणार हे गाणे ऐकण्याची शिक्षा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांचे नवीन गाणे मसक्कली 2.0 हे सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. हे गाणे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दिल्ली-6’ चित्रपटातील मसक्कली गाण्याचे रिमेक आहे. मात्र गाण्याचे मूळ निर्माते असलेले संगीतकार एआर रेहमान आणि गीतकार प्रसून जोशी यांनी देखील या रिमेकवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता जयपूर पोलिसांनी देखील या गाण्यावर निशाणा साधत नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात घरातच राहण्याची चेतावणी दिली आहे. बाहेर फिरताना आढळल्यास पोलिसांकडून विशेष शिक्षा दिली जाणार आहे.

https://twitter.com/jaipur_police/status/1248175433213816832

‘मसक्कली 2.0’ च्या रिमेकवर एआर रेहमान यांनी व्यक्त केली नाराजी

जयपूर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. यामध्ये एका व्यक्तीला जबरदस्तीने गाणे ऐकायला लावले असल्याचे दिसत आहे. यासोबतच पोलिसांनी चेतावणी दिली की, जर तुम्ही विनाकारण बाहेर फिरताना आढळला तर एका खोलीत बंद करून मसक्कली 2.0 हे गाणे वारंवार ऐकायला लावले जाईल. सोबतच पोलिसांनी गाण्याचे बोल देखील शेअर केले.

जयपूर पोलिसांच्या फॉलोअर्सना देखील हे ट्विट भलतेच आवडले व त्यांनी देखील या रिमेक गाण्यावर निशाणा साधला.

दरम्यान, मसक्कली 2.0 गाणे रिलीज झाल्यापासून या गाण्यावर मूळ निर्मात्यांपासून चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. संगीतकार एआर रेहमान, प्रसून जोशी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली.

मसक्कली 2.0 हे गाणे तुलसी कुमार आणि साचेत टंडन यांनी गायले असून, याला संगीत तनिष्क बागचीने दिले आहे.

Leave a Comment