लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांची महाबळेश्वरवारी


मुंबई : येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 लोक राज्यात संचारबंदी असताना महाबळेश्वरला आलेले सापडले. गृह मंत्रालयाचे पत्र त्यांच्याकडे असल्याने त्यांना प्रवासात कुणीच अडवले नसल्याचे वृत्त आहे. हे कुटुंब महाबळेश्वर प्रशासकीय यंत्रनेकडून तपासणी दरम्यान एका बंगल्यात सापडले. तिथून त्यांना हलवले असून पाचगणीतील रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. 188 प्रमाणे सर्वांवर गुन्हे दाखल केले जाण्याचीही माहिती आहे. दरम्यान, खंडाळा ते महाबळेश्वर वाधवान कुटुंबातील 23 लोकांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार, असल्याचे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. तर, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याची चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र राज्यपालांना दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. राज्यात संचारबंदी असताना या कुटुंबाला कोणी परवानगी दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचे पत्र असल्यामुळे रस्त्यात त्यांना कोणीच अडवले नाही. या पत्रावर सर्व वाहनांचे क्रमांक आणि सदस्याची माहिती आहे. या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून महाबळेश्वरमध्ये एका बंगल्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वांना पाचगणीतील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखाने दिली आहे.

हे सर्वजण डीएचएसएल दिवान हाउसिंग फाईनान्स यांच्या बंगल्यावर वास्तव्यास होते. 23 मध्ये बंगल्याचे मालक आणि कामगारांचा समावेश आहे. महाबळेश्वरातील गणेश नगर सोसायटी शेजारी हा बंगला आहे. या सर्वांचे म्हणणे होते आम्हाला बंगल्यातच होम क्वॉरंटाईन करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करताना प्रशासकिय यंत्रणा घाबरली असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता महाबळेश्वरात दाखल झाले आहेत.

Leave a Comment