कळव्यातील सहा वर्षांच्या मुलीला, तर मुंब्र्यातील तब्बल पाच जणांना संसर्ग


ठाणे : गेल्या 24 तासांत मुंबई उपनगरातील ठाण्यात तब्बल सात नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. यातील पाच रुग्ण हे एकट्या मुंब्रा या भागातील असून तर इतर दोन रुग्ण हे कळवा परिसरातील आहेत. त्यातील एक पीडित सहा वर्षांची मुलगी असल्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण रुग्णांची संख्या 33 वर पोचली आहे.

आधीच सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण कळवा विभागात सापडलेले असतानाच आज आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कोरोनाची बाधा कळवा येथील एका सहा वर्षांच्या चिमुरडीला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तिला याची लागण कशी झाली, याचा तपास आता सुरू आहे. या चिमुरडीला कोरोनाची बाधा झाल्याने पालिकेकडून तिच्या घरच्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. याच कळवा विभागात कोरोनाची बाधा झालेल्या एका व्यक्तीच्या पत्नीला देखील कोरोनाबाधा झाल्याचे समोर आल्यामुळे कळव्यात दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कळवा विभागात आतापर्यंत एकूण 12 रुग्ण आढळून आल्याने कळवा हा ठाण्यातील हॉटस्पॉट तर बनत नाही ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

दुसरीकडे एकाच दिवशी मुंब्रा या विभागात पाच नवीन रुग्ण आढळून आले आहेत. काळसेकर हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच व्यक्तीच्या संपर्कात आढळून आलेले पाच रुग्ण आल्याने त्यांनादेखील हा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आले असून यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. आतापर्यंत मुंब्रा विभागात एकूण आठ रुग्ण आढळून आले असून त्यातील एकाचा मृत्यूदेखील झाला आहे.

ठाणे महानगरपालिकेतील कळवा आणि मुंब्रा हे दोन कोरोनाबाधित रुग्णांचे हॉटस्पॉट तर बनत नाही ना याकडे आता पालिकेने लक्ष द्यायला हवे. कळवा आधीच आठ दिवसांसाठी शटडाऊन केलेले असले तरी मुंब्रा येथील परिस्थिती अजूनही नियंत्रणात नसल्यामुळे पोलीस आणि पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Comment