देशात कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 6412, तर 199 लोकांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असून कोरोग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे देशात 199 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6 हजारांच्या पार झाला आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मागील 24 तासांत 591 लोकांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सध्याच्या आकडेवारीनुसार, देशात 6412 रूग्ण आहेत, तर आतापर्यंत 477 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

देशांत मागील 24 तासांत झालेल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्रात आठ, गुजरात आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मिरमध्ये दोन तसेच पंजाब, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 9, तर पंजाब आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तेलंगणामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

पश्चिम बंगाल आणि कर्नाटकामध्ये प्रत्येकी पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेश, जम्मू कश्मीर आणि उत्तरप्रदेशमधून प्रत्येकी चार लोकांचा मृत्यू झाला आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये संसर्ग झालेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर बिहार, हिमाचल प्रदेश आणि ओडिसामध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांमध्ये 71 विदेशी नागरिक आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या 149 सांगितली होती.

कोरोना व्हायरससारख्या घातक आजाराविरोधातील लढाईचा आजचा शंभरावा दिवस आहे. भारतासह संपूर्ण जगभरात मागील 100 दिवसांत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतासह संपूर्ण जगभरात या आजारामुळे लाखो लोक बाधित आहेत. 95 हजारपेक्षा जास्त लोकांचा जगभरात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोणालाच माहिती नाही की, या व्हायरसचा सामना आणखी किती दिवस करावा लागणार आहे. या महामारीमुळे गुरुवारी मृतांचा आकडा 90,000 पार पोहोचला आहे. मृतांच्या एकूण आकडेवारीपैकी 90,938 रूग्णांपैकी सर्वाधिक प्रभाव इटली, स्पेन आणि अमेरिकेवर झाला आहे. इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून आतापर्यंत 18,279 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment