ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमधून बाहेर


लंडन : कोरोनाग्रस्त ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आता त्यांना आयसीयूमधून बाहेर आणले आहे. पण अद्यापही जॉनसन यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, 27 मार्च रोजी बोरिस जॉनसन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. पण त्यांची प्रकृती 6 एप्रिल रोजी खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.

मार्च महिन्याखेरीस ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉनसन यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांसाठी ब्रिटिश पंतप्रधानांनी स्वतःला आयसोलेट केले होते. दरम्यान, जॉनसन यांच्या ऑफिसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहिती पत्रकात पंतप्रधानांची प्रकृती स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. परंतु, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर जॉनसन यांच्या ऑफिसच्या वतीने सांगण्यात आले होते की, जॉनसन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. पण व्हेंटिलेटर लावलेले नाही. त्यांना लंडन येथील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी जॉनसन लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली होती. यासंदर्भात मोदींनी ट्विट केले होते. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एक ट्विट केले आहे. त्यांनीही जॉनसन लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

Leave a Comment