धारावीत सापडले आणखी 5 रुग्ण, एकूण संख्या 22 वर


मुंबई : कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण धारावीत आढळ्याने खळबळ उडाली आहे. तीन पुरुष आणि दोन महिलांचा या रुग्णांमध्ये समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. धारावीत आता एकूण रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी दोघेजण हे तबलिगी समाजाचे होते. या दोघांच्या नावाचा पोलिसांच्या यादीत समावेश होता. त्यांची तपासणी केली असता पॉझिटिव्ह निघाले आहेत.

दरम्यान, राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे हे दोघेही आयसोलेटेड करण्यात आलेले होते. खरंतर राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण राजधानी मुंबईत आढळले आहेत. त्यातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. धारावीतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्यास संपूर्ण राज्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. या पार्श्वभूमीर मुंबई महानगरपालिकेने धारावीसाठी स्पेशल प्लॅन आखला आहे.

जास्त संशयित धारावीतील ज्या भागात आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल. संपूर्ण धारावीचे ड्रोनच्या मदतीने सॅनिटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनकडून दीडशे डॉक्टर देण्यात येणार आहेत. ज्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाईल, अशी माहिती आहे.

मुंबई महापालिकेचे अधिकारी, खासदार राहुल शेवाळे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष यांची या प्लानबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानुसार ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन दीडशे डॉक्टर देणार आहे. त्यांच्या मदतीने संपूर्ण धारावीतील लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. यात 2 खाजगी डॉक्टरांबरोबर दोन महापालिकेचे डॉक्टर आणि एक सहाय्यक अशी पाच जणांची एक टीम तयार केली जाणार आहे. अशा टीम्स तयार करून त्या 10 दिवसांमध्ये धारावीतील साडेसात लाख रहिवाशांचे स्क्रिनिंग करणार आहेत.

धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये यात लक्षणे आढळणाऱ्या लोकांना आयसोलेशनसाठी ठेवण्यात येणार आहे. तर ज्यांना ठळकपणे लक्षणे दिसून येतील त्यांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या जाणार आहेत. ज्या भागात जास्त संशयित आढळतील तो भाग हळूहळू पूर्णपणे बंद करण्यात येईल. ड्रोन च्या मदतीने संपूर्ण धारावीचे सॅनिटायझेशन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

Leave a Comment