लॉकडाऊन वाढवणारे पहिले राज्य बनले ओडिशा


नवी दिल्ली – देशभरात सध्या लॉकडाउनच्या निर्णयाचे पुढे काय होणार? याचीच चर्चा सुरु आहे. त्यातच महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांची स्थिती महाभयंकर कोरोना व्हायरसमुळे बनली आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढवण्याची मागणी काही राज्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर विचार सुरू असतानाच लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे.

ओडिशा हे लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य असल्यामुळे देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही असाच निर्णय होण्याची शक्यता वाढली आहे. ओडिशामध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे.

केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित केला होता. लॉकडाउनचा आजचा १४ वा दिवस आहे. विशेष कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या याच लॉकडाउनच्या काळात प्रचंड वेगाने वाढली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लॉकडाउन संपायला सात दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र, तेलगांना, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ आणि झारखंड सरकारनं आधीच लॉकडाउन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचबरोबर लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडेही केली आहे. लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भाष्य केंद्र सरकारकडून करण्यात आलेले नाही. लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारच्या विचाराधीन असतानाच ओडिशा सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली असून ३० एप्रिलपर्यंत ओडिशामध्ये लॉकडाउन असणार आहे. त्यातच ओडिशातील शैक्षणिक संस्था १७ जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारकडे ३० एप्रिलपर्यंत देशातील विमानसेवा, रेल्वे सेवा सुरू करू नये, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment