राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेचे आमदार म्हणून उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्याची शिफारस


मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिफारस करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त असून त्यापैकी एका जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणूक कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोणताही घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपालांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेचे आमदार नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे यांना संविधानाच्या कलम 164 (4) अंतर्गत सहा महिन्यात राज्याच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनणे अनिवार्य असल्यामुळे मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना 28 मे आधी विधीमंडळाचा सदस्य बनणे आवश्यक आहे. पण सध्या कोरोनाचे संकट पाहता ही विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यामुळे या परिस्थितीत घटनात्मक पेच निर्माण होऊ नये यासाठी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळात एकमताने घेण्यात आला.

विधानपरिषदेच्या नऊ सदस्यांची मुदत येत्या 24 एप्रिल रोजी संपत आहे. परंतु या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक कोरोनामुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या 24 एप्रिल रोजी विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर, काँग्रेसचे हरीसिंह राठोड, शिवसनेच्या नीलम गोऱ्हे, भाजपचे अरुण अडसड, पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ आणि याची मुदत संपत आहे.

Leave a Comment