धारावीतील सर्व कोरोनाग्रस्तांचे निजामुद्दीन मरकज कनेक्शन


मुंबई : देशासह महाराष्ट्रालाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात विशेषत: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहेत. कोरोनाचे वरळी, धारावी हे परिसर हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकट्या धारावीत कोरोनाचे 13 रुग्ण सापडले आहेत. त्यातच आता या सर्व कोरोनाग्रस्तांचे निजामुद्दीन मरकज कनेक्शन समोर आले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमातून परतलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील धारावीतील हे सर्व 13 रुग्ण आहेत. ही माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे धारावीतील सर्व कोरोनाग्रस्तांना मशिदीतून लागण झाल्याचे वृत्त आहे.

कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातच्या मरकजमुळे वेगाने वाढ झाल्याचे आरोग्य मंत्रालयानेही म्हटले आहे. या कार्यक्रमात देश विदेशातील लोक सहभागी झाले होते. त्यानंतर हे विविध राज्यांमध्ये गेले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यांच्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धारावीत सापडलेले सर्व कोरोनाग्रस्त हे निजामुद्दीन मरकजमधून परतलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आले आणि त्यांना मशिदीतून कोरोनाची लागण झाल्याचे कळते.

दरम्यान काल (8 एप्रिल) एकाच दिवसात धारावीत सहा कोरोनाचे रुग्ण आढळले. येथे आतापर्यंत दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. काल एका 64 वर्षीय व्यक्तीचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला तर त्याआधी 56 वर्षीय व्यक्तीने सायन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला होता. धारावीत जवळपास 15 लाख लोक छोट्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. 10 बाय 15 च्या घरात 10 ते 15 लोक राहतात. परिणामी हा शहरातील सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. धारावी लघु उद्योग आणि लेदर इंडस्ट्रीसाठीही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे कठीण आहे. धारावीतील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Leave a Comment