कौतुकास्पद ; भारतीय वंशाच्या उद्योगपतीने दुबईत कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दान केली पूर्ण बिल्डींग


दुबई : जगभरातील अनेक देशांमधील जनजीवन कोरोना व्हायरसमुळे ठप्प झाले आहे. या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा सर्व परिस्थितीत माणुसकीचे दर्शन होताना देखील दिसत आहे. सध्या तरी कोणतेच औषध कोरोनाशी लढण्यासाठी उपलब्ध नाही. पण कोरोनाला हद्दपार करण्यासाठी माणुसकी पुढे येत आहे. दुबईतील एका भारतीय वंशांच्या उद्योगपतीने कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांवर उपचारासाठी अनोखी मदत केली आहे. भारतीय उद्योगपतीने कोरोनाग्रस्तांवर उपचार व्हावेत यासाठी संपूर्ण बिल्डिंग दान केली आहे. लोकांना या बिल्डिंगमध्ये क्वारंटाइन करता येणार आहे.

यासंदर्भातील वृत्त खलीज टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार कोरोनाग्रस्तांसाठी दुबईतील सराफ उद्योजक अजय शोभराज यांनी जुमैराह लेक टॉवर नावाची बिल्डिंग दिली आहे. क्वारंटाइन झालेल्यांना यामध्ये ठेवण्यात येणार आहे. 77 हजार स्क्वेअर फूट जागेत असलेल्या बिल्डिंगमध्ये 400 जणांवर एकाच वेळी उपचार होऊ शकतात.

अजय शोभराज यांनी दुबईतील हेल्थ अथॉरिटीला पत्र लिहिले असून त्यात म्हटलं की, जे शहर देखभाल करते त्या शहराला मदत करा आणि त्याचे कर्ज फेडा. मला वाटते की या संकट काळात आपण ज्या देशात राहतो तिथे कोरोनापासून वाचण्यासाठी सहकार्य गरजेचे आहे. त्यासाठी लोकांनी पुढे येणे आवश्यक आहे. या काळात सरकारची मदत करून माझ्या 25 वर्षांच्या यशात वाटा असलेल्या या शहरासाठी काहीतरी केल्याचा मला खूप मोठा आनंद आहे.

सर्व सोयी सुविधा जुमैराह लेक टॉवरमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये इमारतीला स्वच्छ आणि कीटाणूमुक्त ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. यामुळे संक्रमित रुग्णांवर योग्य उपचार होतील आणि सुरक्षेच्या सर्व अटीही पूर्ण होतील. कोरोनाचा प्रादुर्भाव संयुक्त अरब अमिरातीत वाढला आहे. आतापर्यंत जवळपास 2 हजार कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द कऱण्यात आली आहेत. याशिवाय संचारबंदीही लागू कऱण्यात आली आहे.

Leave a Comment