पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 200 पार


मुंबई : कोरोनाग्रस्तांचा राज्यातील आकडा झपाट्याने वाढत असून राज्यातील 162 जणांचे रिपोर्ट आज (9 एप्रिल) कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 297 वर पोहोचला आहे. यात मुंबई, ठाणे आणि पुण्यातील कोरोना रुग्ण हे धक्कादायक रित्या वाढताना दिसत आहे.

देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांचा राज्यातील आकडा हा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 हजार 297 वर पोहोचला आहे. आज मुंबईत 143 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. तर त्यापाठोपाठ पुणे 3, पिंपरी चिंचवड 2, यवतमाळ 1, अहमदनगर 3, ठाणे 1, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 4, मिरा-भाईंदर 1, वसई विरार 1, सिंधुदुर्ग 1 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.


मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दररोज 60 ते 100 रुग्णांची वाढ होत आहे. मुंबईत आज 143 रुग्ण वाढले असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 891 वर पोहोचली असल्यामुळे मुंबईकरांसाठी कोरोना हा चिंतेचे विषय बनला आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबा घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्य सरकारतर्फे केले जात आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा पुण्यातही 200 च्या वर गेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड 5 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 204 झाला आहे.

Leave a Comment