जगभरात कोरोनाचे मृत्युतांडव; मृतांचा आकडा 88 हजार पार


नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचे मृत्युतांडव सुरु असून या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या व्हायरसमुळे कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात देखील झपाट्याने वाढ होत आहे. जगभरात आतापर्यंत 88 हजारांहून अधिक लोकांनी कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. तर जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांच्या पार गेली आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासांत सहा हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर नव्याने 78 हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

अमेरिका कोरोना व्हायरसचे नवे केंद्र झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात जास्त दिसून येत आहे. अमेरिकेतील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 4 लाखांच्या पार झाली आहे. आतापर्यंत येथे 4,27,101 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या अमेरिकेत आहे. कोरोनामुळे अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांत 1800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हाच मृतांचा आकडा वाढत 14 हजार पार गेला आहे.

अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना बाधित स्पेनमध्ये आहेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 1,48,220 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा 14,792 वर पोहोचला आहे. स्पेननंतर इटलीमध्येही कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा अधिक आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 1,39,422 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 17,669 लोकांचा मृत्यु झाला आहे.

कोरोना व्हायरसचा कहर फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये देखील पाहायला मिळतो आहे. जर्मनीमध्ये आतापर्यंत 1,13,296 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 2,349 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये 1,12,950 लोकांना या जीवघेण्या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्गामुळे आतापर्यंत फ्रान्समध्ये 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 60,733 लोकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 7,097 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या 4263 वर पोहोचली आहे. तिथे 61 लोकांचा मृत्यू झाला आहे.

या देशांव्यतिरिक्त इराण, ब्रिटन, आणि कॅनडा या देशांमध्येही कोरोनाने तीव्र प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. तर चीनमधील ज्या वुहान प्रांतात कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती. तिथे मंगळवारी या व्हायरसमुळे एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला नाही. तेथील लॉकडाऊन देखील हटवण्यात आला आहे.

Leave a Comment