गरज पडल्यास ‘खाकी’ घालून पोलिसांसह मैदानात उतरणार बाजीराव सिंघम

कोरोना व्हायरसपासून मुंबईला वाचविण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस प्रशासन दिवस-रात्र काम करत आहेत. मुंबई पोलिस सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत. मुंबई पोलिसांनी शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओनंतर अभिनेता अजय देवगणने देखील स्वतः खाकी परिधान करून मुंबई पोलिसांसोबत उभे राहून कोरोनावर मात करण्यासाठी पुढे येणार असल्याचे म्हटले आहे.

8 एप्रिलला मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी जर ते 21 दिवस घरात असते, तर त्यांनी काय केले असते ? या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. या प्रश्नावर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी 21 दिवस कुटुंबासोबत वेळ घालवला असता. काहींनी सांगितले, पुस्तके वाचली असती, चित्रपट पाहिले असते, मुलांबरोबर खेळलो असतो.

मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतूक करत अजय देवगणने देखील हा व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, मुंबई पोलीस कोरोना व्हायरसोबत युद्ध लढत आहेत.

यावर मुंबई पोलिसांनी देखील अजय देवगणला मजेशीर उत्तर देत लिहिले की, डिअर सिंघम, आम्ही केवळ तेच करत आहोत, ज्याची खाकीकडून अपेक्षा केली जाते. जेणेकरून पुन्हा गोष्टी सामान्य व्हाव्यात – वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई.

यावर अजय देवगणने केलेले ट्विट सर्वांनाच भावले. त्याने लिहिले की, डिअर मुंबई पोलीस, तुम्ही जगात सर्वोत्तम म्हणून ओळखले जाता. कोव्हिड-19 शी लढण्यासाठी तुमची कामगिरी कौतुकास्पद आहे. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा सिंघम देखील खाकीमध्ये तुमच्यासोबत उभा असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.

सोशल मीडियावर मुंबई पोलीस आणि अजय देवगण यांचा हा संवाद चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave a Comment