लॉकडाऊननंतर असे असणार आहे रेल्वेचे नियोजन


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. 14 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपणार आहे. सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक या काळात बंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने लॉकडाऊननंतर रेल्वे वाहतूक कधी सुरु होणार हा सवाल अनेकांना पडला आहे. पंतप्रधानांनी देशात घोषित केलेला लॉकडाऊन 14 एप्रिलला संपल्यानंतर नियोजन करण्यासाठी नुकतीच रेल्वे प्रशासनाची एक व्हिडीओ कॉन्फरन्स पार पडल्याची माहिती आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीआरबीने या कॉन्फरन्समध्ये असे संकेत दिले आहेत की कोरोना प्रकरणांच्या संख्येनुसार लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन विभागांमध्ये विभाजन करण्याचा सरकार विचार करीत आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कोणतीही परिवहन सेवा सुरू केली जाणार नाही, पिवळ्या झोन मधील सेवा प्रतिबंधित असतील आणि ग्रीन भागांमध्ये सेवांच्या संख्येवर कोणतेही बंधन नसणार आहे.

या दरम्यान सामाजिक अंतर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांत राखले पाहिजे. 3 टायर स्लीपर आणि एसी 3 टायरमधील बर्थचे वाटप केले जाणार नाही. ट्रेनमध्ये किचन किंवा जेवण सेवा कोरोनाची प्रकरणे कमी होईपर्यंत दिली जाणार नाही, अशी देखील माहिती आहे. सर्व नियोजित वेळापत्रक रद्द करण्यात येणार असून केवळ विशेष गाड्या चालविल्या जातील, अशी माहिती आहे.

थर्मल स्क्रीनिंग सर्व रेल्वे स्थानकांच्या सर्व प्रवेश गेटवर केली जाईल. तसेच महत्वाचे म्हणजे 60 वर्षांवरील प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी एवढ्यात दिली जाणार नसल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. प्रवासादरम्यान मास्क परिधान करणे अनिवार्य केले जाणार असून मास्क न घातल्यास प्रवाशांकडून दंड आकारण्यात येणार आहे. तसेच विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताब्यात घेतले जाणार आहे. कोणत्याही अनारक्षित प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही. कारण समजा कुणी प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यास त्या कोचने प्रवास केलेल्या इतर प्रवाशांना शोधून काढणे आवश्यक आहे.

सध्याच्या ट्रेंडनुसार कोलकाता वगळता बहुतेक मेट्रो शहरे रेड झोनमध्ये येतील. त्यामुळे मुंबई, दिल्ली, सिकंदराबाद येथून जाण्यासाठी कोणतीही ट्रेन सुरू करणे किंवा थांबविणे शक्य होणार नाही. चेन्नई, बंगळूरुमध्ये परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत कोणतीही कोचिंग सेवा न वापरणे चांगले होईल. दरम्यान, 30 एप्रिलला याबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, अशी चर्चा या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये झाल्याची माहिती आहे.

कोरोनाबाधित बऱ्याच प्रकरणांमध्ये लक्षणे नसतात. जे काही लक्षणे दाखवत नाहीत आणि म्हणून त्यांची तपासणी करता येत नाही. त्यामुळे धावत्या गाड्या ज्या हॉटस्पॉट्स दरम्यान धावतील त्या ठिकाणांवर थांबवणार नाहीत, असे सुचवण्यात आले आहे. सीआरबीनेही सूचना केली होती की, राज्य सरकारशी आपणही संपर्क साधावा आणि रेल्वे चालविण्यासाठी त्यांची सीमेपर्यंत सेवा चालवण्याची परवानगी घ्यावी. काहींनी अशी सूचना केली होती की, आम्ही राज्य हद्दीत मर्यादीत सेवा चालवल्या पाहिजेत, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment