अमेरिकेने दिली जागतिक आरोग्य संघटनेची रसद रोखण्याची धमकी


वॉशिंग्टन – जागतिक आरोग्य संघटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पक्षपातीपणाचा आरोप केला असून जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून होणारा निधीचा पुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे. जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असताना चीनसाठी जागतिक आरोग्य संघटनेने अनुकूल भूमिका घेतल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे.

अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला निधीचा पुरवठा केला जातो, त्यावर नियंत्रण आणणार असल्याचे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले. अमेरिकेकडून सर्वाधिक निधी संयुक्त राष्ट्राशी संलग्न असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेला मिळतो. यापूर्वी सुद्धा संयुक्त राष्ट्र आणि अन्य संस्थांवर ट्रम्प यांनी टीका केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी कसा रोखणार त्याबद्दल त्यांनी कुठलीही सविस्तर माहिती दिली नाही. पण त्याच पत्रकार परिषदेत काही मिनिटात ट्रम्प म्हणाले की, मी असे काही करणार आहे, हे मी म्हटलेले नाही. निधी पुरवठा बंद करण्याचा विचार करु, असे मला म्हणायचे होते.

याआधीही ट्रम्प यांनी ट्विटरवरुन जागतिक आरोग्य संघटनेचा कारभार चीन केंद्रीत असल्याचा आरोपही केला होता. अमेरिकेत चीनवर खासकरुन रिपब्लिकन पक्षाकडून मोठया प्रमाणावर टीका सुरु आहे. चीनने कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आणि मृतांच्या आकडयाबद्दल जी माहिती दिली, त्यावरही ट्रम्प यांनी शंक उपस्थित केली आहे. ट्रम्प यांनी देखील वेळीच उपायोजना न केल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा मोठया प्रमाणावर टीका सुरु आहे. आधी त्यांनी अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला होता. नंतर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. कोरोनामुळे अमेरिकेत १२ हजार पेक्षा जास्त नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

Leave a Comment