इंडस्ट्रिमधील 16000 मजूरांच्या खात्यात सलमान खानने जमा केले 4 कोटी 80 लाख


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे सर्वसामान्यांसह अनेकांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. अशातच बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरीव मालिकांचे चित्रीकरणही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याने या क्षेत्राशी निगडीत 16000 मजूरांना आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या केलेल्या घोषणेनुसार मंगळवारपासून सलमान खानने मजूरांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.

या क्षेत्रीशी निगडित 16000 मजूरांच्या बँक खात्यामध्ये सलमान खानकडून प्रत्येकी 3000 रूपये जमा करण्याची सुरुवात केली आहे. अशाप्रकारे दोन दिवसांमध्ये म्हणजेच, मंगळवार, बुधवारपर्यंत या सर्व मजूरांच्या खात्यामध्ये 4 कोटी 80 लाख रूपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे (FWICE) अध्यक्ष अशोक दुबे यांनी दिली असून यासंदर्भातील वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे.

21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 19 मार्च पासूनच बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहेत. अशातच चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिराती आणि वेब सीरिजच्या शुटिंगशी निगडीत मजूरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच इतर बॉलिवूड सेलिब्रिटींव्यतिरिक्त सलमान खाननेही या मजूरांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment