लॉकडाऊन तोडल्यामुळे आरोग्यमंत्र्यांवर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी केली कारवाई


वेलिंग्टन – जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये कोरोनाचा फैलाव झाला असून कोरोनामुळे स्पेन, इटली, अमेरिकेसारख्या देशांमध्ये हजारोंच्या संख्येत मृत्यू झाला आहे. कोरोनाचे ९६९ रुग्ण न्यूझीलंडमध्येही आढळले असून कोरोनामुळे या देशात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. देशाच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी याच पार्श्वभूमीवर काही भागांमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. पण लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु असतानाच देशाच्या आरोग्यमंत्र्यांनीच नियमांची पायमल्ली केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर कारवाई केली आहे. यासंदर्भातील वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे.

लॉकडाउनचे नियम तोडल्याप्रकरणी न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी स्वत:ला ‘इडियट’ असे म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रकरणात त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान आर्डेन यांच्याकडे सोपवला होता. पण देशात कोरोनाचे संकट असतानाच आरोग्यमंत्र्यांचा राजीनाम स्वीकारण्यास पंतप्रधानांनी नकार दिला आहे. आरोग्यमंत्री क्लार्क यांच्यावर याप्रकरणात कारवाईही करण्यात आली आहे. देशातील कोरोना संसर्गासंदर्भातील सगळी सुत्रे क्लार्क यांच्या हाती असल्याने त्यांचे मंत्रीपद वाचले असले तरी त्यांना डिमोट (पदावनतीची कारवाई) करण्यात आले आहे. क्लार्क हे लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत स्वत:च्या कुटुंबासहित किनारपट्टी भागातील रस्त्यावर २० किलोमीटरच्या लाँग ड्राइव्हला गेले होते.

आपली चूक क्लार्क यांनी मान्य केली असून असे काही आपल्याकडून व्हायला नको होते, असेही त्यांनी म्हटले आहे. एकीकडे देशातील जनतेला आम्ही घरात बसण्यास सांगत असतानाच सरकारला मीच अडचणीत आणणारे कृत्य केले आहे. मी वेड्यासारखे वागलो आहे. लोक माझ्यावर त्यामुळे संतापले आहेत याची मला जाणीव असल्याचे म्हणत क्लार्क यांनी घडलेल्या प्रकरणाबद्दल स्वतःवर संताप व्यक्त केला आहे.

क्लार्क यांनी केलेले कृत्यू चुकीचे असून त्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नाही. पण सध्या कोरोनाच्या संकटाला तोंड देण्याला आमच्या सरकारचे प्राधान्य असल्यामुळेच आरोग्य क्षेत्रामध्ये मोठा गोंधळ निर्माण होईल असा निर्णय घेणे परवडण्यासारखे नाही. या एकमेव कारणासाठी क्लार्क यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याचे आर्डेन यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment