कोरोना : फेसबुक संशोधकांना देणार युजर्सची लोकेशन हिस्ट्री

जगभरात हजारो लोकांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोव्हिड-19 वरील उपचार आणि लस शोधण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र कार्य करत आहेत. या व्हायरसवर मात करण्यासाठी टेक्नोलॉजीचा देखील वापर केला जात असून, आता सोशल मीडिया कंपनी फेसबुक देखील यासाठी मदत करणार आहे.

फेसबुकने स्पष्ट केले की, कंपनी आपल्या युजर्सची माहिती गोपनीय ठेवत त्यांच्या हालचाल (लोकेशन हिस्ट्री) आणि नात्यांविषयी संशोधकांना माहिती देईल, जेणेकरून व्हायरसचे संक्रमण पुढे कोणत्या भागात पसरू शकते याची माहिती मिळू शकेल.

फेसबुकचे अधिकारी एक्स जिन आणि लौरा मॅकगोर्मन यांनी पोस्टमध्ये लिहिले की, कंपनी आपल्या युजर्सच्या हालचालीविषयी मॅपला अपडेट करत आहे. ज्यात इनसाइट मूव्हमेंटचा समावेश आहे. यात युजर्सची खाजगी माहितीगोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जिन आणि मॅकगोर्मन यांनी पोस्टमध्ये लिहिले की, हॉस्पिटल योग्य संसाधनांसाठी काम करत आहेत आणि सार्वजनिक आरोग्य प्रणालीला योग्य दिशानिर्देशांची गरज आहे. त्यांना कोणते प्रतिबंधात्मक उपाय फायदेशीर ठरत आहेत आणि व्हायरसचा प्रसार कसा होऊ शकतो याबद्दल त्यांना योग्य माहितीची आवश्यकता आहे.

मागील आठवड्यात गुगलने देखील अशाच प्रकारे संशोधकांना युजर्सची माहिती देण्याची घोषणा केली आहे. जेणेकरून, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मदत मिळू शकेल.

Leave a Comment