नियम फक्त मरकजवालेच मोडत नाहीत, ‘सामना’तून मोदींवर टीका


मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असून आपल्या देशातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. अशा या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावरून शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून सडकून टीका केली आहे.

रविवारी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले होते. परंतु, त्यांच्या या आवाहनानंतरही लोकांनी एकत्र जमून गोंधळ घातला होता. त्याचबरोबर भाजपचे आमदार तर मशाल घेऊन रस्त्यावर उतरले होते. सेनेने आजच्या ‘टाळ्या, थाळ्या आणि दिवे; अशाने युद्ध हरू’ या अग्रलेखातून त्यांच्या वर्तवणुकीवरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आपला पानिपतच्या युद्धात पराभव अफवा, नियोजनशून्यता यामुळे झाला होता. ‘पानिपत’सारखी कोरोना युद्धाची स्थिती होऊ नये. जनतेचा सदाशिवराव भाऊ होऊ नये. हाती मशाली आहेत, त्यात स्वत:चेच कपडे जळू नये. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे; जे सांगितले तेच घडावे. उलट वागणाऱ्यांना अद्दल घडवावी. फक्त `मरकज’वालेच नियम मोडतात असे नाही! मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत, असा टोला भाजपला लगावण्यात आला आहे.

आज हजारो रुग्ण कोरोनामुळे मृत्यूशी झुंज देत आहेत. काहींनी यामुळे आपले प्राणही गमावले आहेत. अशा वेळी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता लोक रस्त्यांवर घोळक्याने फिरतात, घोषणा देतात, फटाके फोडतात, आतिषबाजी करतात हा सगळाच प्रकार हास्यास्पद म्हणावा लागेल. पंतप्रधान नक्की काय सांगत आहेत ते समजून न घेता जनता अशी मनमानी करते. त्यास युद्ध म्हणता येणार नाही. हा सरळ सरळ आत्मघात आहे. पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाही. शेवटचा अर्थ असा की, जे घडते आहे तसे `उत्सवी’ वातावरण पंतप्रधानांनाच हवे आहे, अशी टीकाही सेनेनं केली.

सध्या चीनबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सगळ्यात जास्त शिवराळ भाषा वापरत आहेत, पण चीनला शिव्या देऊन त्यांना कोरोनावर मात करता आली नाही. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाने हजारो बळी घेतले आहेत. कोरोनापुढे महासत्ता अमेरिका हतबल आणि लाचार झाली आहे. पंतप्रधान मोदींकडे कोरोनाशी लढण्यासाठी ट्रम्प यांनी औषधे मागितली आहेत. भारताकडे ट्रम्प यांनी थाळ्या, घंटा, शंख, मेणबत्या किंवा पणत्या मागितल्या नाहीत हे आपल्याकडील उत्साही व उत्सवी प्रजेने समजून घेतले पाहिजे, असा टोलाही लगावण्यात आला.

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या सोमवारी 830 च्या घरात पोहोचली. तसेच मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 490 झाला आहे. म्हणून लोकांनी शिस्त पाळायलाच हवी असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. लोकांना मदत कशी करता येईल यावर ठाकरे हे भर देत आहेत. वैद्यकीय सुविधा कशा वाढवता येतील यावर लक्ष ठेवून आहेत. लोकांशी सहज सरळ पद्धतीने, कोणताही गोंधळ उडणार नाही अशा रीतीने संवाद साधत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री या नात्याने जी परिस्थिती हाताळत आहेत ती खरच कौतुकास्पद असल्याचे ट्विट ओमर यांनी केले आहे. जे युद्ध कोरोनाशी सुरू आहे त्या युद्धात लढण्यासाठी अशाच सेनापतीची गरज असल्याचे कौतुकही उद्धव ठाकरेंचे करण्यात आले आहे.

Leave a Comment