ट्रम्प यांच्या धमकीनंतर २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध भारताने हटवले


नवी दिल्ली – २४ औषधे आणि औषध निर्मिती घटकांच्या निर्यातीवर असलेले निर्बंध भारताने उठवल्याची माहिती सरकारक़डून देण्यात आली आहे. जेनेरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार म्हणून भारत देश ओळखला जातो. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या पुरवठयावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली होती. मागच्या महिन्यात काही औषधांच्या निर्यातीवर कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले होते.

दरम्यान पॅरासीटेमोल औषधांच्या निर्यतीवर निर्बंध कायम असून हे निर्बंध भारताने तडकाफड़की का उठवले? हे स्पष्ट झालेले नाही. पण यामागे अमेरिकेचा दबाव असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये शनिवारी फोनवरुन चर्चा झाली होती. ट्रम्प यांनी त्यावेळी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली होती.

दोन्ही नेत्यांमध्ये औषध पुरवठयाच्या साखळीमध्ये कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, यासाठी परस्परांच्या संपर्कात राहण्याचे ठरले आहे. शनिवारी ट्विट करुन ही माहिती व्हाइट हाउसच्या प्रवक्त्यांनी दिली होती. भारताने टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर, मास्क आणि अन्य सुरक्षा उपकरणे यांच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.

हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या गोळया कोरोना व्हायरसच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरत असल्यामुळे ट्रम्प यांनी शनिवारी मोदींबरोबर फोनवरुन चर्चा केली, त्यावेळी या औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्याची विनंती केली होती. पण सोमवारी वॉशिंग्टनमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन गोळयांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले नाहीत तर, जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली.

Leave a Comment