अंदमानच्या प्राचीन जारवा आदिवासींना करोना नको म्हणून खास उपाय


फोटो सौजन्य स्कूपव्हूप
हजारो वर्षे अंदमान निकोबार बेटांवर वास्तव्य करून असलेल्या आणि आता नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचलेल्या जारवा आदिवासींना करोनाचा उपद्रव पोहोचू नये यासाठी खास व्यवस्था केली गेली असून या बेटाजवळून जाणारे रस्ते बंद केले गेले आहेत तसेच समुद्री मार्गाने या बेटाच्या दिशेने येणाऱ्या बोटींवर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे.

अंदमान निकोबारचे डीजीपी दीपेंद्र पाठक या संदर्भात माहिती देताना म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत या बेटावर कोविड १९ ची लागण होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. ही आदिवासी जमात हजारो वर्षे येथे वास्तव्य करत आहे मात्र बाहेरच्या जगाशी त्यांचा कोणताही संपर्क नाही. त्यांना करोना म्हणजे काय याची काहीही माहिती नाही. मात्र जगातील मोजक्या आदिम जमातीपैकी ही एक जमात आहे आणि त्यांचे संरक्षण आवश्यक आहे. अन्यथा ही जमात नामशेष होण्याची भीती आहे.

या बेटावरील ट्रायबल वेल्फेअर विभागाने १६ मार्च रोजीच येथे जाणारा रस्ता बंद केला आहे. पर्यटक, स्थानिक, मच्छिमार या बेटाजवळ जाऊ नयेत यासाठी दक्षता घेतली जात आहे. अंदमान विमानतळावर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात आहे. २४ मार्च रोजी निजामुद्दीन मधून आलेल्या दोन मरकत प्रवाशाना ताप होता त्यांना वेगळे ठेवले गेले आहे. मरकत चे एकूण ९ प्रवासी येथे आले होते त्यांच्या करोना चाचण्या पोझिटिव्ह आल्या आहेत.

जारवा आदिवासी जमात माणसांच्या नुसती संपर्कात आली तरी त्यांना संसर्ग होऊ शकेल अशी भीती आहे आणि या आदिवासींना करोना संसर्ग झालाच तर मोठे संकट उभे राहील असे म्हटले जात आहे. हे आदिवासी तसेही कुणाला जवळ येऊ देत नाहीत. समजा कुणी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर बाण मारतात. एका २७ वर्षी अमेरिकन पर्यटकाला याच प्रकारे त्यांनी बाण मारून ठार केले होते. तरीही अनेक उत्साही पर्यटक मच्छिमारांच्या सहाय्याने या बेटावर जाण्याचा प्रयत्न करतात असे पाठक यांनी सांगितले.

Leave a Comment