तबलिग्यांना सूचना, स्वतःहून समोर या अन्यथा दाखल करणार खूनाचा गुन्हा

तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांना स्वतःहून पुढे येऊन माहिती देण्यास सांगितले जात आहे. मात्र विविध राज्यांच्या सरकारच्या आवाहनानंतर देखील जमातमध्ये सहभागी झालेले नागरिक स्वतःहून प्रवासाची माहिती देत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता उत्तराखंड सरकारने सक्त पावले उचलली आहे.

उत्तराखंड पोलिसांनी चेतावणी दिली आहे की, तबलिगी जमातच्या सदस्यांनी स्वतः अधिकाऱ्यांना याबाबत 6 एप्रिलपर्यंत माहिती द्यावी अन्यथा प्रवासाची माहिती लपवल्याचे आढळल्यास त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला जाईल.

उत्तराखंडमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 26 असून, त्यातील 16 जणांचा तबलिगी जमातशी संपर्क आहे.

डीजीपी अनिल के रातूरी यांनी आवाहन केले आहे की, तबलिगी जमातचे सदस्य, जे कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यांनी 6 एप्रिलपर्यंत स्वतः पोलीस अथवा अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. अशा लोकांची वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यांना क्वारंटाईनमध्ये पाठवले जाईल. तसेच त्यांनी आवश्यक ती वैद्यकीय मदत देखील दिली जाईल.

डीजीपी चेतावणी देत म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून माहिती लपवल्याचे आढळल्यास व त्या व्यक्तीमुळे संसर्ग पसरला तर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाईल.

Leave a Comment