पुणेः शस्त्रक्रिया केलेला रुग्ण निघाला कोरोनाग्रस्त; डॉक्टरांसह ९३ जण क्वारंटाइन


पुणे – पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील एका धक्कादायक प्रकारामुळे ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने ३१ मार्चला अपघातग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया खासगी केल्यानंतर त्या रुग्णामध्ये ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. त्याचा चाचणी अहवाल तातडीने पाठवण्यात आला, तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यामुळे संबंधित डॉक्टर आणि संपर्कात आलेल्या इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोनाने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये देखील थैमान घातले असून आत्तापर्यंत २१ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यांपैकी १२ जणांवर यशस्वी उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातच ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यामुळे ९३ डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

३१ मार्चला कासारवाडी येथे रिक्षा चालक असलेल्या या व्यक्तीचा अपघात झाला होता. त्याच्या पोटाला गंभीर इजा झाल्यामुळे त्याला तातडीने एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जाण्यात आले. डॉक्टरांनी तिथे त्याच्यावर उपचार केले. परंतु, त्याच्या पोटाला गंभीर इजा झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया झाली. पण त्यानंतर त्या रिक्षाचालकामध्ये ताप, सर्दी आणि खोकला याची लक्षणे आढळल्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तातडीने त्याचे रिपोर्ट पाठवण्यात आले. तेव्हा, त्यामध्ये हा रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ९३ जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट आज येणार असल्याची माहिती रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment