पुणेकरांची चिंता आणखी वाढली, पुण्यात 104 कोरोनाग्रस्त


पुणे : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असून त्यातच पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. कोरोनाचे 104 रुग्ण एकट्या पुण्यामध्येच आहेत, तर पुणे जिल्ह्यातील 5 कोरोनाग्रस्त मृत्यूमुखी पडले असून काल रविवारी 5 एप्रिलला यातील 3 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना लागण झालेले सध्या 98 जण आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोनाग्रस्तांची पुणे शहरातील संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचे रुग्ण पुण्यातील सर्वच भागात आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे सहकारनगर, मंगळवार पेठ, नाना पेठ, सिंहगड रोड, कोंढवा या भागात आढळले आहेत.

तर सिंहगड रोडवरील वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्ता पेठ, गंज पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, शुक्रवार पेठ, पर्वती गाव, सय्यदनगर, हडपसर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, मुंढवा, कोरेगाव पार्क, कोथरूड, मांजरी, नांदेड सिटी, मांगडेवाडी, कात्रज, कर्वेरोड, गुलटेकडी, लक्ष्मीनगर -येरवडा, कल्याणीनगर, बाणेर या ठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईत 8 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईत 108 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आज दिवसभरात मुंबईत ५३ रुग्ण वाढले आहेत. गेल्या तीन दिवसांत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या 8 जणांपैकी 2 जण वयोवृद्ध होते. तर या 2 जणांसह एकूण 6 जण आधीपासूनच खूप दिवस आजारी होते. त्यामुळे आता मुंबईत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 433 एवढी झाली आहे. आता पर्यंत केवळ मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment