लॉकडाऊन : दिवा लावताना वापरू नका सॅनिटायझर, सरकारचे आवाहन

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी टाळ्या, घंटी, थाळी वाजवण्यास सांगितले होते. मात्र यावेळी अनेकांनी सोशल डिस्टेंसिंग न पाळत गर्दी केली होती.

आता पुन्हा एकदा मोदींनी जनतेला या कठीण स्थितीमध्ये एकता दाखवण्यासाठी आज (5 एप्रिल) रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरात, बाल्कनीत, दारासमोर मेणबत्ती, दिवे, टॉर्च अथवा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र यावेळी सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

सरकारची अधिकृत ब्रॉडकास्टिंग एजेंसी असलेल्या प्रसार भारतीने ट्विट करत सांगितले की, दिवे लावताना नागरिकांनी हाताला अल्कोहॉल असलेले सॅनिटायझर लावणे टाळावे. कारण सॅनिटायझर हे ज्वलनशील असतात.

सॅनिटायझरमध्ये 60 ते 70 टक्के अल्कोहॉल असते. त्यामुळे ते ज्वलनशील आहे. जर कोणी सॅनिटायझर लावून दिवा लावण्याचा प्रयत्न केला, तर हात आगीच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. यामुळे हात भाजू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दिवा अथवा मेणबत्ती लावताना हाताला सॅनिटायझर लावू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment