कोकणालाही तबलिग्यांचा फटका; मरकजला गेलेल्या रत्नागिरीतील व्यक्तिला कोरोनाची लागण


रत्नागिरी : दिल्लीतील तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेले लोक कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. तबलिगी जमातीच्या मरकजमध्ये सामील झालेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न होत असून त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना हॉटस्पॉट म्हणून राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन या भागाला घोषित करण्यात आले. रत्नागिरीतील सात जण याच ठिकाणी गेल्याची बाब आता समोर आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यापैकी एक रूग्ण हा कोरोनाबाधित असल्याचे आता रिपोर्टमधून समोर आले आहे. रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रूग्णालयात या रूग्णावर उपचार सुरू आहेत.

मरकजला गेलेले 5 जण जिल्हा रूग्णालयात क्वॉरन्टाईन करून ठेवण्यात आले आहेत. या 5 जणांपैकी एकाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तर, एक मुंबई आणि एकाला आग्रा या ठिकाणी क्वॉरन्टाईन करून ठेवण्यात आले आहे. मरकजला गेलेल्या एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधिताची संख्या ही पुन्हा एकवर आली आहे.

रत्नागिरीतील राजीवडा येथे कोरोनाबाधित आलेला व्यक्ति हा राहतो. हा व्यक्ति 18 मार्च रोजी मरकजहून रत्नागिरीमध्ये आला होता. तो तेव्हापासून अनेकांच्या संपर्कात आला आहे. आता या साऱ्यांची टेस्ट केली जाणार आहे. शिवाय, खबरदारीचा उपाय म्हणूव पुढील 15 दिवस 3 किलोमीटरपर्यत हा परिसर सील केला जाणर आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे देखील यावेळी हजर होते. तर, परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी घाबरण्याचे कारण नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे.

Leave a Comment