जगभरात 10 लाखांहून अधिक कोरोना बाधित; तर 50000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु


नवी दिल्ली : जगभरात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव थांबायचे नाव घेत नाही. आता दहा लाखांच्या पुढे जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला आहे. तर 50,000 पेक्षा जास्त लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एका दिवसांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे. लॉकडाऊनमध्ये अर्ध्याहून अधिक जग असूनही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

इतर माध्यमांच्या वृत्तानुसार जगभरातील 1 लाख 98 हजार 390 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामुळे 59 हजार 159 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत दोन लाख 28 हजार 923 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत 14,681 लोकांचा इटलीमध्ये मृत्यू झाला असून 119,827 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांच्या आकड्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्पेन असून आतापर्यंत 11,198 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 119,199 लोक कोरोना बाधित आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत मृतांचा आणि कोरोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. आतापर्यंत 7392 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 277,161 लोक कोरोनाग्रस्त आहेत.

कोरोना व्हायरसमुळे फक्त युरोपमध्ये 40,000 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यामधील तीन चतुर्थांशपेक्षा अधिक लोकांचा इटली, स्पेन आणि फ्रान्समध्ये मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीचे संकट अमेरिकेत दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. अमेरिकेत येत्या काही दिवसात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1 लाख ते 2 लाखांपर्यंत पोहचू शकते, अशी भीती नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिजीजचे संचालक प्रख्यात संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील व्हेंटिलेटर्स काही दिवसात संपू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाचा अतिशय वेगाने अमेरिकेत, विशेषत: न्यूयॉर्कमध्ये फैलाव झाल्यामुळे पुढील दोन आठवडे अतिशय वाईट असू शकतात, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारीच म्हटले होते. पुढील काही दिवस अतिशय अवघड असणार आहेत. प्रत्येक अमेरिकन नागरिकानं त्यासाठी तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

Leave a Comment