नऊ मिनिट केल्यास संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका : उर्जामंत्री


मुंबई : येत्या 5 एप्रिलला संध्याकाळी 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पण एकाच वेळी 9 मिनिटे लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका उदभवू शकतो. जनतेने संभाव्य धोका लक्षात घेता, लाईट बंद न करता दिवे लावावेत, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी जनता कर्फ्यूच्या वेळी सायंकाळी पाच वाजता थाळी, टाळी वाजवण्यास सांगितले होते.

देशात एकाचवेळी जर लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होईल. विजेची मागणी लॉकडाऊनमुळे आधीच घटल्यामुळे जनरेशन आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. सर्वांनी जर एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बिघडून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विजेची मागणी ग्रीडमध्ये अचानक वाढल्यास आणि कमी झाल्यास फ्रिक्वेन्सी फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा काळजीपूर्वक विचार जनतेने करावा व लाईट बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावावी असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

सद्य स्थितीत महाराष्ट्र राज्याची पॉवर डिमांड ही 23 हजार मेगावॅट वरून 13 हजार मेगावॅट आली आहे. इंडस्ट्री लोड लॉकडाऊनमुळे पूर्णतः झिरो झाले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा 13 हजार मेगावॅट विजेवर लोड आहे. अचानक सर्वांनी दिवे बंद केल्यास ग्रीड फेल होऊन सर्व पॉवरस्टेशन हायफ्रिक्वेन्सीवर ग्रीड होतील. मोठ्या प्रमाणात पॉवर डिमांड असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात वीज फेल्युरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडल्यास मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर होईल आणि संपूर्ण देश अंधारात जाईल. यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एक पॉवर स्टेशन सर्व्हिसमध्ये यायला साधारणतः 16 तास लागतात. याप्रमाणे सर्व परिस्थिती साधारण व्हायला एक आठवड्याचा कालावधी लागेल. सर्व युद्धासाठी या देशातील वीज ही सर्वांत महत्त्वाची घटक आहे. त्यामुळे विजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

Leave a Comment