पुण्यात मागील 24 तासांत सापडले 14 नवे कोरोनाग्रस्त


पुणे : कोरोनाग्रस्तांचा राज्यातील आकडा वेगाने वाढत असल्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान पुण्यामध्ये मागील चोवीस तासात 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 57 जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची पुण्यामधील संख्या आता 84 हून अधिक पोहोचली असून आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पॉजिटिव्ह रूग्ण हडपसर, पिंरगुटमध्येही सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्ण पॉझिटिव्ह सापडलेला परिसर हा सील करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यामध्ये एकूण 1599 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून यामध्ये 84 हून अधिक लोक कोरोना बाधित आढळले आहेत. तर यातील 170 जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. तर तब्बल 1406 जणांची चाचणी नेगेटिव्ह आली आहे.

देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरांमध्ये आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. संपूर्ण शहरांमध्ये यासाठी जंतूनाशक फवाराणीदेखील केली जात आहे. अवघ्या तीन दिवसात पुणे मनपाच्या आरोग्य विभागाने नायडू हॉस्पिटलच्या गेटवर निर्जंतवणुकीकरण फवारा यंञणा बसवली आहे. या सँनिटायझर फवारा टनेल पँसेजमुळे नायडू हॉस्पिटलमध्ये येणारा आणि जाणारा प्रत्येक व्यक्ती हा पूर्णपणे सँनिटाईज होऊनच बाहेर पडणार आहे. त्यामुळे या संसर्ग रूग्णालयात काम करणारे डॉक्टर्स नर्सेस आणि इतर स्टाफला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण कोरोनाच्या संसर्गाचा त्यांनाच मोठा धोका संभवत आहे.

या साथीचा कहर भारतात या महिन्याच्या अखेरीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिल्यामुळे लॉकडाउन संपले तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत. जे आत्ता इटली आणि स्पेनमध्ये घडत आहे तसा वेगाने फैलाव आणि वाढता मृत्युदर रोखायचा असेल तर घरात राहण्याशिवाय पर्याय नाही, असे तज्ज्ञ सांगतात. गर्दी टाळली तरच या विषाणूचे संक्रमण आटोक्यात राहील. भारतासारख्या देशात लोकसंख्या आणि राहण्याची पद्धत लक्षात घेता कोरोनाची साथ उग्र रूप धारण करू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment