कोरोना विरोधातील लढ्यासाठी जागतिक बँकेची एक अब्ज डॉलरची मदत


वॉशिंग्टन : जागतिक बँकेने कोरोना विरोधातील लढ्यासाठी भारताला एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीसाठी मंजुरी दिली आहे. २५ देशांची जागतिक बँकेच्या सहाय्यता योजनेतून १.९ अब्ज डॉलरच्या पहिल्या टप्प्यात मदत केली जाणार आहे. तसेच, नवीन उपक्रम ४० हून अधिक देशांमध्ये वेगाने आखले जात आहेत.

भारताला जागतिक बँकेकडून आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून सर्वाधिक निधी दिला जाणार आहे. जो एक अब्ज डॉलर असणार आहे. जगभरातील विकसनशील देशांसाठी आपत्कालीन सहाय्यता योजनेच्या पहिल्या टप्प्याला जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर जागतिक बँकेने सांगितले की, कोरोनावर मात करण्यासाठी भारतात एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून चांगले स्क्रीनिंग, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळा, व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत मिळेल.

जागतिक बँकेने दक्षिण आशियात पाकिस्तानसाठी २० कोटी डॉलर, अफगानिस्तानसाठी १० कोटी डॉलर, मालदीवसाठी ७३ लाख डॉलर आणि श्रीलंकेसाठी १२. ८६ कोटी डॉलरची सहाय्यता करण्यास मंजुरी दिली आहे. याचबरोबर, जागतिक बँकेने म्हटले आहे की, जगभरातील कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी १५ महिन्यांच्या दृष्टीने १६० अब्ज डॉलरच्या आपत्कालीन सहाय्यता निधीच्या योजनेला मंजुरी दिली आहे.

Leave a Comment