भयंकर…! अमेरिकेत शवपेट्यांचा तुटवडा


न्यूयॉर्क : जगातील बलाढ्य आणि श्रीमंत देश अशी ओळख असलेला अमेरिका कोरोनाचे आता मुख्य केंद्र बनले आहे. कोरोनामुळे अमेरिकतील न्यूयॉर्क शहर कोलमडून पडले आहे. त्या ठिकाणी मृतांची संख्या एवढी आहे की हॉस्पिटल्समधील शवागारसहित इतर सगळ्या जागा कमी पडत आहेत. हीच परिस्थिती अमेरिकेतील इतर शहरांमध्येही असल्याने मृतदेह झाकायला आणि ठेवायला शवपेट्या आणि ‘बॉडी बॅग’ कमी पडत असल्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावायची कशी असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. एकट्या न्यूयॉर्क शहरात 1,139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत ही संख्या 5,115 एवढी झाली आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेत तब्बल 2 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधनांचीही कमतरता आहे. आपल्या आपत्कालीन साठ्यातून सरकारने 50 हजार बॉडी बॅगची व्यवस्था करण्याची तयारी केली आहे. पण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या बघता सरकारने आणखी 1 लाख बॅग्सची ऑर्डर दिली आहे. या बॅग 7.8 फुट लांब आणि 3.2 फुट रुंद असतात. युद्ध काळात वापरल्या जाणाऱ्या या बॅग आता कोरोनाविरुद्धच्या लढाईत वापरल्या जाणार आहेत.

हिरव्या रंगाच्या नायलॉन बॅगमध्ये अमेरिकेत युद्ध काळात मृतदेहांना ठेवले जाते. आता त्याच बॅगचा वापर केला जात आहे. अशा प्रकारच्या बॅग तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासनाने लष्कराच्या विभागालाच केली आहे. अमेरिकेत सध्या 2 लाख 16 हजार 154 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, 5 हजार 115पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान येत्या काळात मृतांच्या संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णांच्या तब्बल 80% रुग्ण हे न्यूयॉर्कमध्ये आहेत. सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर सर्वात जास्त भार आहे.

Leave a Comment