वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू


मुंबई : मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असून कोरोनामुळे कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा मृत्यू झाला. तर कस्तुरबा रुग्णालयात मोरेश्वर कोळी यांची पत्नी आणि मुलगाही दाखल आहेत. वरळी विभागात कोरोनामुळे झालेल्या त्यांच्या मृत्यूमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

तीन दिवसांपूर्वीच कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर वरळी कोळीवाड्यात कर्फ्यू लावून परिसर सील करण्यात आला आहे. महापालिकेकडून परिसरात निर्जंतुकीकरण सुरु आहे. कोळीवाड्यात येऊन नागरिकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वत: केले होते. तेथील 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान कोरोनाचा शिरकाव वरळी कोळीवाडा, आदर्श नगरनंतर आता वरळी पोलीस वसाहतीतही झाला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. ही इमारत पोलीस कर्मचारी आणि महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी सील केली आहे. अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात या पोलीस कर्मचाऱ्याला उपचारांसाठी दाखल केलं आहे. तर पत्नी कस्तुरबा रुग्णालयात असून मुलाला सेव्हन हिल्स तर मुलीला पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारन्टाईन करण्यात आलं आहे

युवासेना प्रमुख, वरळीचे नवनिर्वाचित आमदार आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यांचे वरळीतील परिस्थितीवर लक्ष असून ते वारंवार मोबाईल फोन आणि सोशल मीडियावर शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून माहिती घेत आहेत. तसेच पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन रहिवाशांच्या सोयी सुविधांबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.

Leave a Comment