लॉकडाऊन : या जोडप्याने चक्क जुळ्या बाळांचे नाव ठेवले ‘कोव्हिड-कोरोना’

कोरोना व्हायरस आणि कोव्हिड-19 हे नाव घेतले तरी अनेकांना भिती वाटते. मात्र छत्तीसगडच्या एका जोडप्याने आपल्या जुळ्या बाळांचे नाव चक्क या व्हायरसच्या नावावरून ठेवले आहे.

छत्तीसगडच्या रायपूर येथे एका जोडप्याने लॉकडाऊनच्या काळात 26-27 मार्चच्या मध्यरात्रीला सरकारी हॉस्पिटलमध्ये बाळांना जन्म दिला आहे. या जोडप्याने मुलाचे नाव ‘कोव्हिड’ तर मुलीचे नाव ‘कोरोना’ ठेवले आहे.

लॉकडाऊनच्या काळात कठीण परिस्थितीचा सामना करत डिलिव्हरी झाली, त्यामुळे मी आणि पतीने हा दिवस अविस्मरणीय करू इच्छित होतो, असे जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या 27 वर्षीय प्रिती वर्मा यांनी सांगितले. हे जोडपे आपल्या बाळांचे नाव नंतर बदलू देखील शकतात.

वर्मा म्हणाल्या की, हा व्हायरस जीवघेणा आहे. मात्र यामुळे लोकांना स्वच्छता, हायजिन आणि चांगल्या सवयी लागल्या आहेत. त्यामुळे आम्ही या नावाचा विचार केला. हॉस्पिटलमधील कर्मचारी देखील बाळाना कोव्हिड आणि कोरोना नावाने बोलवत होते, त्यामुळे आम्ही ही नावे ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सांगितले की, 26 मार्चच्या मध्यरात्री अचानक वेदना सुरू झाल्या. पतीने त्वरित रुग्णवाहिका बोलवली. लॉकडाऊनमुळे वाहने बंद असल्याने पोलिसांनी देखील अनेक ठिकाणी थांबवले. मात्र परिस्थिती बघून त्यांनी आम्हाला सोडले.

आई आणि बाळ दोघेही निरोगी असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे हॉस्पिटलच्या पीआरओ शुभ्रा सिंह यांनी सांगितले.

Leave a Comment