चिंताजनक! मुंबईत ३ दिवसाच्या बाळाला आईसह कोरोनाची लागण


मुंबई – दिवसागणिक देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होत चालली असताना मुंबईतही याची वाढलेली आकडेवारी चिंता व्यक्त करणारी आहे. त्यातच एका महिलेसोबत तिच्या ३ दिवसाच्या बाळालाही कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ही महिला २६ मार्च रोजी पतीसोबत डिलिव्हरीसाठी चेंबूर येथील हॉस्पिटलमध्ये गेली होती. महिला आणि मुलाला डिलिव्हरीनंतर कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

या खासगी हॉस्पिटलवर पतीने आरोप केला आहे की, कोरोना रुग्णाच्या बाजूचा बेड त्याच्या पत्नीला दिला होता. त्यामुळे माझ्या पत्नीला आणि मुलाला कोरोनाची लागण झाली. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. माझ्या पत्नीला ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्याच्या दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलला समजले की, माझ्या पत्नीच्या बाजूला असणाऱ्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. पण हे त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवल्याचा आरोप पतीने केली आहे.

तसेच ज्यावेळी प्रकरण आणखी वाढले त्यावेळी आम्हाला कोरोनाची टेस्ट करण्यास सांगितले. आम्ही त्यासाठी बीएमसीकडून ज्या खासगी लॅबना टेस्टची परवानगी दिली आहे त्यांना बोलावून सँपल दिले. रिपोर्टनुसार माझी पत्नी आणि मुलगा दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या पत्नी आणि मुलाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर त्याठिकाणी उपचार सुरु आहेत.

Leave a Comment