देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2018वर, तर 41 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशामधील कोरोनाग्रस्तांची संख्या 2018 वर पोहोचली असून यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसमुळे 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 169 लोक ठीक झाले आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मागील 24 तासांमध्ये 386 कोरोनाचे नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची संख्या दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमामुळे झपाट्याने वाढत आहे.

कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्यातील पोलीस आयुक्तांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. राज्य सरकारला दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा युद्धपातळीवर कॉन्टेक्ट ट्रेसिंग करण्यास बैठकीमध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर वीजा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेशही देण्यात आले होते. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक 325 कोरोना बाधित आहेत. तर केरळमध्ये 265, तामिळनाडूमध्ये 234, दिल्लीमध्ये 123, उत्तरप्रदेशमध्ये 116, राजस्थानमध्ये 108, कर्नाटकात 105 प्रकरणं समोर आली आहेत. तसेच जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 8 लाखांच्या पार गेला आहे.

Leave a Comment