कोरोनाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांवर इंदूरमध्ये दगडफेक


भोपाळ – आरोग्य विभागाच्या पथकाला कोरोना व्हायरस संदर्भात नागरिकांची तपासणी सुरु असताना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आरोग्य विभागाच्या पथकावरच संतप्त झालेल्या स्थानिकांनी थेट दगडफेक केली. बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास इंदूरच्या टाट पट्टी बाखल भागात ही घटना घडली असून यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

आरोग्य विभागाचे पथक सुदैवाने थोडक्यात या दगडफेकीतून बचावले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या भागात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. दगडफेकीच्या या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

कोरोनाचे दोन रुग्ण टाट पट्टी बाखल भागात सापडल्यामुळे हा भाग प्रशासनाने कोरोनाच्या फैलावाचे मुख्य केंद्र म्हणून घोषित केला आहे. येथे राहणाऱ्या ५४ परिवाराला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन डॉक्टरांना स्थानिकांची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.

या आरोग्य पथकावर काही रहिवाशांनी शिवीगाळ व दगडफेक केल्यामुळे त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला अशी माहिती डीआयजी हरीनारायणचारी मिश्रा यांनी दिली. कोणीही जखमी झालेले नाही. दगडफेक करणारे कोण होते? त्यांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. कलम ३५३ अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल अशी माहिती हरीनारायणचारी मिश्रा यांनी दिली. जवळपासच्या तीन पोलीस ठाण्यातील पथके आता तिथे तैनात करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Leave a Comment