जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भीती; येत्या 7 दिवसांत वाढू शकतो मृतांचा आकडा


जिनिव्हा : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाची लागण जगभरातील तब्बल 9 लाख 35 हजार 817 लोकांना झाली आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 47 हजार 208 लोकांचा मृत्यू झाला आहे. पण आगामी काळात हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. कोरोनाव्हायरस सर्व जगभर झपाट्याने पसरेल. त्यामुळे एका आठवड्यात मृत्यूची संख्या दुपटीने वाढली, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली. कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी एकत्र उभे राहण्याचे डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसियस यांनी आवाहन केले.

टेड्रॉस यांनी यावेळी, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पसरून चार महिने झाले आहे. ही परिस्थिती सद्याच्या घडीला दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रत्येक महिन्यात संसर्ग जलद गतीने होत आहे. ही चिंतेची बाब असून यासाठी आम्ही जगभरातील शास्त्रज्ञांशी संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, जागतिक आरोग्य संघटनेचे टेक्निकल अॅडव्हायझर मॅथ्यू ग्रिफिथ यांनी, कोरोना व्हायरसपासून क्वचित एखादा देश सुरक्षित असेल, अशी अपेक्षा जागतिक आरोग्य संघटना करत नाही. कारण कोरोना व्हायरस कुठेही पसरू शकतो. काही देश आणि क्षेत्रांमध्ये कोरोना व्हायरस कमी होतो आहे, पण त्या ठिकाणाहून इतर नवीन ठिकाणी त्याचा उद्रेक होणे चिंतेची बाब आहे. सध्या फक्त युरोपवर लक्ष केंद्रीत केले जात आहे, पण त्याचा उद्रेक इतर क्षेत्रामध्येही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

चीनच्या वुहानपासून डिसेंबर महिन्यापासून हा व्हायरस पसरण्यास सुरुवात झाली. युरोप, अमेरिकेत कोरोनाने धुमशान घातले आहे. एकट्या युरोपात 30 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स येथील मृतांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर, अमेरिकेतील न्यूयॉर्क हे शहर कोरोनाचे नवे केंद्र तयार झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कम्युनिटी ट्रान्समिशनचा सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवे, असा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेस्टर्न पॅसिफिकचे क्षेत्रीय संचालक ताकेशी कसाई म्हणाले, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रापासून कोरोना व्हायरसचा उद्रेक दूर असला तरीदेखील हा लढा दीर्घकाळ चालणार आहे. ही महासाथ जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत कितीही उपाययोजना केल्या तरीदेखील हा धोका टळणार नाही. त्यामुळे प्रत्येक देशाने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कम्युनिटी ट्रान्समिशनसाठी तयार राहण्याची गरज आहे.

Leave a Comment