लॉकडाऊन दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७० ते ८० जणांवर लातूरमध्ये गुन्हा दाखल


लातूर : लातूर पोलिसांनी शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ७० ते ८० जणांना भर रस्त्यात बसविण्यात आले. सर्वाना लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यापुढील रस्त्यावर सोशल डिस्टनसिंग करुन बसविण्यात आले.

कोरोनाचे संकट राज्यात गडद होत चाल्यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. तरी देखील काही लोक घरात थांबायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे पोलिसांना नाईलाजस्तव घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करावी लागत आहे. राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हात जोडून आवाहन करत आहेत, कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर घराबाहेर पडू नका, काळजी घ्या. पण त्याचे राज्यातील नागरिकांना काही देणे घेणे नसल्याचे शहरात दिसून येत आहे. पोलिसांनी शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १४४ आणि संचारबंदी आदेशांचे उल्लंघन करत फिरण्यासाठी हे सगळेजण घराबाहेर पडले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कलम १८८ प्रमाणे लातूर शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यापुढील रस्त्यावर सर्वाना सोशल डिस्टनसिंग करुन बसविण्यात आले. आतातरी नागरिक घराबाहेर पडणार नाही, अशी चर्चा शहरात सुरु आहे.

Leave a Comment