त्या अल्पसंख्यांक हिंदुंसाठी संकटमोचक बनला शाहिद आफ्रिदी


इस्लामाबाद : जगभरातील अनेक देशांना कोरोनाने ग्रासले आहे. भारताप्रमाणे कोरोना पाकिस्तानमध्येही मोठ्या प्रमाणात शिरकाव करत आहे. पण सोयीसुविधांच्या अभावामुळे पाकमधील लोकांना मदत मिळत नाही आहे. यातच पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूना राशन दिले जात नसल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते. सरकारच्या वतीने देण्यात येणारे राशन पाकमधील हिंदूना काही दिवसांपूर्वी नाकारण्यात आले होते. अशाच हिंदूंना मदत करण्यासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुढे सरसावला आहे.

आपल्या संस्थेच्या माध्यमातून शाहिदी आफ्रिदीने गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी मोफत अन्न आणि वैद्यकीय गोष्टींचे वाटप केले आहे. आफ्रिदीने यासाठी सोशल मीडियावर ‘डोनेट करो ना’ हे अभियान राबवले होते. आफ्रिदीने या अभियानाअंतर्गत पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजू व्यक्तींना अन्नदान केले. आफ्रिदीने आपल्या मदतकार्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.


कोरोनाची भीती सिंध प्रांतात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येथील मुस्लिमांना राशन व आवश्यक वस्तू दिल्या जात आहेत, पण हिंदूंना मात्र त्या वस्तु देण्यास नकार दिला जात आहे. हिंदूंना सांगण्यात आले आहे की, हे राशन फक्त मुस्लिमांसाठी आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाकमधील लॉकडाऊन लक्षात घेता दररोज कामगार आणि कामगारांना स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाच्या वतीने राशन देण्याचे आदेश सिंध सरकारने दिले आहेत. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने हिंदूंना तुम्ही रेशन मिळण्यास पात्र नाही, असे सांगण्यात आले. भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांनीही आफ्रिदीने गरजूंना केलेल्या अन्नदानानंतर त्याचे कौतुक केले आहे. या दोघांनी सध्याच्या परिस्थितीत आफ्रिदीने केलेले काम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment