बृहन्मुंबई महापालिकेकडून खबरदारीचा उपाय, मुंबईतील १४६ परिसर सील!


मुंबई : मुंबई महानगर पालिकेने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील एकूण १४६ परिसर पूर्णपणे सील केले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण या सील केल्या गेलेल्या ‘no-go zones’मध्ये आढळले आहेत किंवा बाधा झालेले रुग्ण या परिसरातील लोकांच्या संपर्कात आले असल्याचे आढळून आल्यामुळे खबरदारीची पावले उचलत हे परिसर सील करण्यात आले आहेत. हे परिसर सील करताना तेथील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरुच राहील याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

त्यानुसार दक्षिण मुंबईतील ४८ परिसर सील करण्यात आले असून यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे. सोमवारी वरळीत कोरोनाचे ८ रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर सील करण्यात आला आहे. वरळी कोळीवाडा परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही मंगळवारी १० वर पोहोचली होती. हा परिसर खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारीच सील करण्यात आला होता. हा मुंबईतील दाट लोकवस्तीचा परिसर आहे. जवळपास ८० हजार लोक येथे राहतात. तेथील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणे शक्य नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे या भागात आरोग्य जनजागृती मोहीम राबवली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तेथे २४ तास वैद्यकीय सेवा सुरु ठेवली आहे, त्याचबरोबर तसेच बाहेर रुग्णवाहिका देखील उभी करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या दाट लोकवस्तीच्या भागात दररोज प्रत्येकाला अन्नधान्य आणि दूध पुरवणे ही खरी कसरत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

तर कोरोनाचा संसर्ग झालेले १३ रुग्ण प्रभादेवीमधील एका चाळीत आढळल्यानंतर हा परिसरदेखील सील करण्यात आला आहे. या परिसरात खानावळ चालवणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तिच्या कोरोनाच्या चाचण्या २४ मार्चला पॉझिटीव्ह आल्या होत्या, तिचा कोरोनामुळे तीन दिवसांनी मृत्यू झाला. पश्चिम उपनगरीय भागात ४६ परिसर हे सील करण्यात आले आहेत. त्यात वांद्रे पश्चिम आणि खार परिसराचा समावेश वरच्या स्थानी आहे. हिल रोड, एसव्ही रोड, २१ रोड, गर्व्हमेंट कॉलनी, बिंबिसार नगर हे परिसर सील करण्यात आले आहेत. तर पूर्व उपनगरीय भागातील ४८ परिसर हे सील करण्यात आले आहेत, यात चेंबूर आणि घाटकोपरमधल्या भागांचा अधिक समावेश आहे.

Leave a Comment