‘मरकज’ प्रकरणी मौलानासह तबलीग जमातच्या इतर काही जणांवर गुन्हा दाखल


नवी दिल्ली : मौलाना मोहम्मद साद कांधलवी आणि तबलीग जमातच्या इतर काही जणांविरोधात दिल्लीतील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरुद्ध महामारी कायदा 1897 आणि भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. मार्च महिन्यात मरकजमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा तोच कार्यक्रम प्रमुख स्रोत बनला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निजामुद्दीनच्या मरकजमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आदेशाचे उल्लंघन करत कार्यक्रमाचं आयोजन झाले. दिल्ली क्राईम ब्रान्चकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार असून लवकरच दोषींना अटक होण्याची शक्यता आहे.

देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशी सूचना देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नागरिकांनी पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर खबरदारी म्हणून धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. तरी देखील या कार्यक्रमाचे आयोजन झाले आणि त्यामधून कोरोनाचा संसर्गही झाला.

येथे सापडलेल्या बहुतांश लोकांना विविध विलगीकरण कक्षात आणि रुग्णालयातील विलगीकरण वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी 16 देशांमधील नागरिकांसह एकूण 1830 जण 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतरही तबलीग जमातच्या मरकजमध्ये सामील झाले होते. गृहमंत्रालयाने सांगितले की, 303 तबलीगंना कोरोनाची लागण झाली असून त्यांना दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment