दिल्लीतील निजामुद्दीन परिसर कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित


मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वेगाने वाढत आहे. त्यातच दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘मरकज’ परिषदेतून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम ‘मरकज’ आता बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे.

हा परिसर काल रात्री उशीरापर्यंत रिकामा करण्याचे काम सुरु होते. या ठिकाणी आता बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. हे ठिकाण दिल्लीतील कोरोना प्रादुर्भावाचे सगळ्यात मोठे केंद्र बनले असून या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण उपस्थित असल्याचे समोर आल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

कोरोनासाठी हजरत निजामुद्दीन परिसर हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. 2137 जण कोरोनाच्या संसर्गाचे केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या 2137 पैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. यापैकी 1203 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 10 राज्यात 800 लोकांचा शोध सुरु आता सुरु आहे. यांच्या संपर्कातील आलेल्यांचे आकडे हजारात असू शकतात. जानेवारीपासून 2 हजार विदेशी तब्लिगी भारतात दाखल झाले होते, अशी देखील माहिती आहे.

विशेष म्हणजे, मरकजमध्ये सामील लोकांची यादी 21 मार्चलाच केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना कळवली होती. 19 मार्चला जेव्हा तेलंगणामध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेले 19 जण पॉझिटिव्ह आढळले होते त्याचवेळी केंद्राने राज्यांना कळवले होते. आज त्याला दहा दिवस पूर्ण होत आहेत.

Leave a Comment