कोरोनाशी लढण्यासाठी या उद्योगपतींनी केला मदतीचा हात पुढे

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. उद्योगजगत देखील आता कोरोनाशी लढण्यासाठी पुढे आले आहे. दोन दिवसांपुर्वीच रतन टाटा यांनी 1,500 कोटी रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली होती. आता रिलायन्स इंडस्ट्रीजने देखील पीएम केअर फंडमध्ये 500 कोटी रुपये देणार असल्याचे सांगितले आहे. रिलायन्सकडून गुजरात आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 5-5 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पीएम केअर फंडमध्ये आनंद महिंद्रा, वेदांता रिसोर्सेजचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्यासह अनेक उद्योगपतींनी दान केले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने याआधी मुंबईत उभारलेल्या कोव्हिड-19 हॉस्पिटलला 100 बेड, डॉक्टर आणि नर्ससाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, 10 दिवस दररोज 5 लाख जणांना जेवण, दररोज 1 लाख मास्क तयार करणे आणि इमर्जेंसी वाहनांमध्ये मोफत इंधन व डबल डाटाची देखील मदत केली आहे.

ओयो रुम्सने अपोलो हॉस्पिटलसोबत भागीदारी करून कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आयसोलेशन रुम बनवले आहेत. हे आयसोलेशन सेंटर मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथे आहेत.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी टाटा ग्रुपने सर्वात मोठी रक्कम देण्याची घोषणा केली आहे. रतन टाटा यांनी आधी टाटा ट्रस्टकडून 500 कोटींची मदत केली जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर 1000 कोटींची अतिरिक्त मदत करणार असल्याचे देखील सांगितले.

वेदांता रिसोर्सेजचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी 100 कोटींची मदत करणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय महिंद्रा ग्रुप आपल्या युनिट्समध्ये वेटिंलेटर बनवणार आहे. तसेच महिंद्रा आपला संपुर्ण पगार कोव्हिड-19 फंडमध्ये देतील.

हिरो सायकल्सने 100 कोटी, बजाज ग्रुपने 100 कोटी, पेटीएमने वेटिंलेटर व इतर आवश्यक वस्तू बनवणाऱ्यांना 5 कोटी, सन फार्मा 25 कोटींचे औषध आणि पारले कंपनी पुढील 3 आठवड्यात 3 कोटी बिस्किट पॅकेट वाटणार आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचे फाउंडेशन औषध आणि लसीच्या संशोधनासाठी 750 कोटी रुपये दान करणार आहेत. फेसबुक अमेरिकेच्या बे-एरियामध्ये दररोज 1000 चाचणी करण्याची व्यवस्था करेल व याशिवाय मार्क झकरबर्गने उपचाराच्या संशोधनासाठी 187.5 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.

अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी देखील 100 कोटींची मदत केली आहे. याशिवाय ते रशियाला 10 लाख मास्क आणि 2 लाख चाचणी किट दान करतील. जॅक मा 24 लॅटिन अमेरिका देशांना 20 लाख मास्क, 4 लाख चाचणी किट आणि 104 वेंटिलेटर दान करणार आहेत.

Leave a Comment