रामदास आठवलेंची कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मदत, गरजूंच्या जेवणाचीही सोय


मुंबई : देशभरातील उद्योजक, राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते, सामान्य नागरिक कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मदतीचा हात देत आहेत. त्यात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आपले योगदान दिले आहे. पीएम केअर्स फंडमध्ये रामदास आठवले यांनी एक कोटी रुपये दिले आहेत. तर महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आपले दोन महिन्यांचे वेतन दिले आहे. त्याचबरोबर 14 एप्रिलपर्यंत आपल्या निवासस्थानी गरजूंना मोफत जेवणाचीही सोय केली आहे.

सरकारपासून आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. डॉक्टरांपासून आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. तर लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस उन्हातान्हात उभे आहेत. त्यातच सरकारला देशातील राजकीय नेत्यांनीही आपापले एक महिन्याचं वेतन मदत म्हणून दिले आहे. रामदास आठवले यांचाही यामध्ये समावेश आहे. ही माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये, राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोनाच्या लढ्याला मदत करण्यासाठी पीएम केयर फंडात माझ्या खासदार निधीतून 1 कोटी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फंडात माझ्या दोन महिन्याचे वेतन देण्याचा आज निर्णय घेतला.

लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर अनेक गरीब, मजुरांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहे. परिणामी अनेकांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. रामदास आठवले यांनी आपल्या निवासस्थानी अशा हातावर पोट असणाऱ्यांच्या जेवणाची सोयही केली आहे.

त्याचबरोबर आपण विरोधी पक्षात असलो तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही सरकारसोबत आहोत, असे रामदास आठवले यांनी सांगितले. त्याचबरोबर यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्लाही उद्धव ठाकरेंना दिला. ते म्हणाले की, कोरोनासारख्या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करुन सर्वांना विश्वासात घ्यावे. राज्यात आम्ही सत्तेत नसलो तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही सर्व एकजुटीने सरकारसोबत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment