शहरांमधून परत जाणारे 30% लोक करू शकतात कोरोनाचा प्रसार – केंद्र सरकार

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अनेकजण शहरातून गावाकडे जात आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरातून गावाकडे जाणाऱ्या 10 व्यक्तींपैकी 3 जण कोरोना व्हायरस आपल्या सोबत घेऊन जात आहेत, अशी माहिती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, आतापर्यंत विमानतळ आणि सीपोर्टवर 28 लाख लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. तर 3.5 लाख लोकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

त्यांनी सांगितले की, 22.28 लाख मजूर, गरीब लोकांना जेवण व आश्रयासाठी सरकारकडून जागा देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 6.63 लाख लोकांना शेल्टर देण्यात आले आहे.

गृह सचिवांनी सांगितले की, आता कोणताही मजूर रस्त्यावर नसून, प्रत्येकाला जवळील शेल्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

सध्या देशभरात 118 चाचणी लॅब असून, याची क्षमता दिवसाला 15 हजार असल्याचे देखील तुषार मेहता यांनी न्यायालयला सांगितले.

न्यायालयाने सांगितले की, भिती ही कोरोना व्हायरसपेक्षा अधिक जणांचे प्राण घेऊ शकते. त्यामुळे सरकारने शेल्टर होममध्ये या मजूरांना आशा, विश्वास देण्यासाठी काउंसिलर, धार्मिक आणि कम्यूनिटी नेत्यांची नेमणूक करावी.

Leave a Comment