
रायपूर : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्तांची भारतातील संख्या 1 हजारहून अधिक झाली आहे. पण उत्तर प्रदेशातील दोन जणांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात न घेताच अजब प्रकार केल्याचे समोर आलं आहे. रायपूर जिल्हा प्रशासनाच्या कंट्रोलरूममध्ये रविवारी संध्याकाळी फोन करून समोसे आणि चटणी मागवल्यानंतर काही मिनिटांनी पुन्हा एक फोन आला. प्रशासनाचे अधिकारीही हा फोन ऐकून चक्रावले. समोरच्या व्यक्तीने यामध्ये चक्क खायचे पान पाठवून द्या अशी ऑर्डर केली होती. हा अजब प्रकार रायपूर कोतवाली क्षेत्र परिसरात घडला.
कंट्रोल रूममध्ये फोन करुन आधी मागवले समोसे नंतर दिली पानाची ऑर्डर
पान आणि समोशाच्या ऑर्डर वडील आणि मुलाने मिळून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कंट्रोल रूममध्ये मोहल्ला कुचा फरगाना येथील वडिलांनी मुलाला फोन करून पान पाठविण्याची मागणी केली. कॉल करणाऱ्यांने सांगितले मी पान खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पान पाठवण्याची व्यवस्था करा. प्रशासनाचे अधिकारी त्यांच्या या फोनमुळे बुचकळ्यात पडले. कोतवाली पोलिसांना फोन करणाऱ्या व्यक्तीच्या घरी पाठवून पुन्हा असे न कऱण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या कंट्रोलरुमध्ये आधी मुलाने समोसा आणि चटणी पार्सल पाठवून देण्याची मागणी केल्यानंतर पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला कडक इशारा दिला.
याबाबत माहिती देताना रामपूरचे मुख्य पोलीस अधिकारी शगुन गौतम म्हणाले की, काही लोकांना सध्याच्या परिस्थितीचे साधं गांभीर्यही कळत नाही. अशा पद्धतीचे फोन करून प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत. असे फोन येणे आता नेहमीचे झाल्यामुळे आमच्या डोक्याला ताप झाला आहे. अनेक नागरिकांनी लॉकडाऊनमुळे असे फोन केले. अशा प्रकारच्या कॉलमुळे या कठीण काळात काम करण्यात अडचण निर्माण होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे असे फोन ब्लॉक करण्यात येतील शिवाय समाजात जाहीरपणे अशांची नाव उघड करण्यात येतील. त्यामुळे अशी मस्करी किंवा असे प्रकार तातडीने थांबवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
